धाराशिव (प्रतिनिधी)- धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रस्त्याचे व नालीचे काम करण्यात येत आहे.  रस्ता व नालीचे काम करताना त्याची गुणवत्ता राखण्यात आली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कामाची पाहणी करून दर्जेदार काम करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात यावे असे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, या सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी केलेल्या नालीवरील स्लॅब काही दिवसांतच कोसळले आहेत. अनेक ठिकाणी नालीवर मोठे भगदाड पडल्याने त्यापासून वाहनधारक, नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नालीवर स्लॅब टाकल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारण्यात आले नाही. परिमाणी काही दिवसांतच स्लॅब कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी नागरी वसाहती आहेत. या वसाहतीमध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर नालीचे बांधकाम करताना काही ठिकाणी डांबरी रस्त्यापासून नालीची उंची अधिक झाली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन जाण्यासाठीही नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

शिवाय सर्व्हिस रस्त्यालगत विजेचे खांब उभारण्यात आले आहेत. हे खांबही सरळ रेषेत नाहीत. सर्व्हिस रस्ता एकसमान नाही. काही ठिकाणी त्याची रुंदी कमी केलेली आहे. हा रस्ता सर्वच ठिकाणी 6 मीटर रुंदीचाच करावा. एकंदरित सर्व्हिस रस्ता, त्यालगतच्या नालीचे काम अंत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, या सर्व्हिस रस्त्याची देखभाल करणाऱ्या संबंधित सक्षम अधिकाऱ्याला सोबत घेऊन आपण या कामाची स्वतः पाहणी करावी, उर्वरित काम थांबवावे व हे काम दर्जेदार करण्याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला आदेशित करावे. तसेच सदरील कामाची गुणवत्ता गुणनियंत्रकाकडून (क्वॉलिटी कंट्रोल) तपासावी.

या सर्व्हिस रस्त्याचे व त्यालगतच्या नालीचे काम दर्जेदार नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, रवि वाघमारे, युवराज देशमुख,प्रदीप साळुंके, युवराज मसे,महेश शेरकर, सुहास शेरकर, बाळासाहेब जेवे, शिवाजी इंगळे, नागेश जगदाळे, बालाजी शेरकर,सागर शेरकर, बंडू पाटील, अमित शेरकर, नवनाथ शेरकर, ऋषिकेश शेरकर, अभिषेक शेरकर, अभिजीत शेरकर, सुरज शेरकर, कैलास शेरकर, हरिश्चंद्र शेरकर, सुरेश शेरकर, संपत शेरकर, सुरज शेरकर, श्रीनिवास शेरकर, ओंकार शेरकर, प्रथमेश शेरकर, अंगद शेरकर, धोंडीबा शेरकर, निजाम शेख, इब्राहिम शेख,  रमेश ढवळे, राज निकम, प्रसाद तेरकर, किरण शेरकर, अनिल शेरकर, सुमित बागल आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top