उमरगा (प्रतिनिधी)- शासनाच्या विविध योजना गरीब, दिव्यांग, वृद्ध व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले आहेत. लाभार्थ्यांना तहसील व पंचायत समिती कार्यालयांचे चकरा टाळता यावेत, यासाठी शिबिरे आयोजित करण्यावर भर देण्यात आला.
उमरगा तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पगारी योजना आदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार प्रविण स्वामी, तहसीलदार गोविंद येरमे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. खासदार ओमराजे यांनी यावेळी स्पष्ट केले की, आधार प्रमाणीकरणाच्या अभावामुळे अनेक पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांसाठी केवायसी व आधार प्रमाणीकरण शिबिरे तातडीने आयोजित करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला मागितल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत 4057 लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय 660 स्पॉन्सरशिप प्रकरणे मंजूर झाली असून, 604 नवीन प्रकरणांना मंजुरी व 340 प्रकरणे प्रक्रियेत आहेत. या बैठकीस विठ्ठल चिकुंद्रे, ज्योती राजपूत, स्मिताताई चव्हाण, हरी माडजे, माजी जिप सदस्य दीपक जवळगे, अजिंक्य पाटील, अमोल बिराजदार, अजित चौधरी, जाधव काका आदी मान्यवर उपस्थित होते.