धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजाई कृषी उत्पन्न वृद्धी अभियान जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी नव्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे. तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा आणि मसला शिवारात 1000 एकर क्षेत्रावर हा महत्वपूर्ण प्रकल्प सुरू होत आहे. त्याच्या कार्यवाहीस प्रारंभही झाला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत बाबींच्या मदतीने शेतकरी बांधवांचे उत्पन्न दीडपट वाढविण्याच्या दृष्टीने मित्रच्या माध्यमातून हे क्रांतिकारी अभियान आपण हाती घेतले आहे. या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांनी गुरुवारी जागेची पाहणी केली असल्याची माहिती आमदार तथा मित्रचे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
मित्रच्या नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वृद्धीच्या अनुषंगाने तुळजाई कृषी उत्पन्न वृद्धी अभियान या अभूतपूर्व प्रकल्पाची मांडणी आपण केली होती. मित्रचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाचे महत्व जाणून घेत तातडीने मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांना याबाबत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश 24 एप्रिल रोजी दिले होते. त्यानुसार 13 मे रोजी मुंबई येथील मित्रच्या कार्यालयात आपल्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पुढील टप्प्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा आणि मसला शिवारातील 1000 एकर जागेची पाहणी केली आहे. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांसोबत चर्चा करून या महत्वपूर्ण प्रकल्पाबाबत उपस्थित तज्ञ मान्यवर मंडळींनी माहिती दिली.
संस्थेचे प्रमुख विलास शिंदे यांनी मित्रच्या बैठकीत त्याबाबत अधिकृत संमती व्यक्त केली. यावेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणेचे महानिदेशक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे, अणुऊर्जा विभागाचे डॉ. नितीन जावळे, हिंदुस्तान ऍग्रो को. ऑप. लि. चे कार्यकारी अध्यक्ष श्री. भारत ढोकणे पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.