धाराशिव (प्रतिनिधी)-  येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतीही पावसाच्या पाण्यावर केली जाते. बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू पद्धतीने शेती करतात. शेतकऱ्यांना यावर्षी चांगले उत्पादन झाले पाहिजे, यासाठी सन 2025 च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना  निविष्ठा खरेदी करतांना अडचण जाणार नाही, याची दक्षता घेऊन कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले, येत्या खरीप हंगामात जिल्ह्यासाठी महाबीजच्या ज्या बियाण्यांची आवश्यकता आहे, त्याची मागणी आताच महाबीजच्या जिल्हा कार्यालयाने कृषी विभागाच्या समन्वयातून महाबीज अकोला यांच्याकडे करावी. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. आपण स्वतःही त्यासाठी महाबीजच्या महाव्यवस्थापकांशी बोलणार आहोत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस खताच्या पुरवठा होणार नाही, याची दक्षता आतापासूनच घ्यावी. बोगस खतांची तपासणी करण्यात यावी. बोगस खत विक्री होत असल्याचे लक्षात आल्यास तातडीने संबंधित कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांना खत तपासणीसाठी किट उपलब्ध करून द्यावी, असेही सरनाईक यांनी सांगितले.

खासदार राजेनिंबाळकर, आमदार स्वामी यांचेही भाषण झाले. विविध योजनांची वर्षनिहाय माहिती माने यांनी यावेळी दिली.  जिल्ह्यात माने यांच्या नेतृत्वात कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे काम करीत असल्याबद्दल सरनाईक व खासदार राजेनिंबाळकर यांनी त्यांचे कौतूक केले.

 
Top