धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे. निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घेऊन जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री. सरनाईक बोलत होते. यावेळी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विरोधात प्रभावीपणे मोहीम राबवावी, असे सांगून सरनाईक म्हणाले.विद्यार्थी आणि युवक वर्गामध्ये व्यापक प्रमाणात अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्यात येईल. यासाठी एक महिला पोलिस उपनिरीक्षकाची व पुरुष उपनिरीक्षकांची नियुक्ती करावी. जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी 9 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नाविन्यपूर्ण योजना केवळ शहरी भागातच न राबविता ग्रामीण भागातही राबविण्यात येईल.जिल्ह्यातील इयत्ता 7 वी ते 10 वीच्या 20 विद्यार्थ्यांना यामध्ये 10 मुले व 10 मुली यांना अंतराळाच्या अभ्यासासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील नासाच्या अंतराळ संशोधन केंद्रात अभ्यासासाठी व भेट देण्यासाठी पाठविण्यात येईल, याचा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येईल, असेही सरनाईक म्हणाले.

शहराच्या ठिकाणी पाच जलतरण तलाव बांधण्यात येतील,असे सांगून सरनाईक म्हणाले,त्यामुळे चांगले जलतरणपटू जिल्ह्यात तयार होतील.विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील. जिल्ह्यातील युवावर्ग विविध शासकीय सेवेस उच्च पदावर पोहोचला पाहिजे, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांची एमपीएससी व यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील यांनी विकास प्रश्नांबाबत मार्गदर्शन करून विविध मागण्या मांडल्या. यावेळी विविध यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाकडून जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त निधीतून करण्यात आलेली व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. सभेच्या प्रारंभी जम्मू काश्मिरमधील पहेलगाम येथे आंतकवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना उपस्थितांनी उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली.

 
Top