धाराशिव (प्रतिनिधी)-  निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे जाहीर केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक याविषयी सरकारने काहीही केले नाही. हे फसवणूक सरकार असून, वेगवेगळ्या विचारांचे हे सरकार आहे. आरएसएस, शिवसेना, राष्ट्रवादी अशा विचारांचे हे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले आहे. 

गुरूवार दि. 8 मे रोजी धाराशिव येथे सायंकाळी माळी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, खलील सय्यद, प्रशांत पाटील, उमेश राजेनिंबाळकर, सिध्दार्थ बनसोडे, निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. कांचनकुमार चाटे, राजेंद्र शेरखाने आदी उपस्थित होते. पुढे बोलताना माळी यांनी जून महिन्यात ओबीसी समाजाचा भव्य मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे घेणार असून, या मेळाव्यास राहूल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह मान्यवर नेते मंडळी येणार आहेत. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. परंतु जनगणने संदर्भात अधिक तपशील दिला नाही. 


विशेष अधिवेशन बोलावावे लागेल

जातनिहाय जनगणनेची घोषणा सरकारने केली आहे. परंतु ही जातनिहाय जनगणना शिक्षक करणार आहेत का अंगणवाडी कार्यकर्ती करणार आहेत या संदर्भात कोणतही अधिक माहिती दिलेली नाही. जातनिहाय जनगणनेसाठी 25 हजार कोटी रूपये खर्च लागणार आहे. या संदर्भात अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवून परवणी मागणी करून ही तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने मते वळविण्यासाठीच जातनिहाय जनजगणनेची घोषणा केली का? असा प्रश्न पडतो असे भानुदास माळी यांनी व्यक्त केले. 


निवडणूका बॅलेट पेपरवर घ्या

सुप्रिम कोर्टाने स्थानिक स्वराज्य निवडणूका आरक्षित जागेसह घ्या असा आदेश दिला आहे. त्यामुळे या निवडणूका लवकरच लागतील. हिमंत असेल तर या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या असे आव्हान भानुदास माळी यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे. यावेळी त्यांनी वाढीव लाईट बील, ईडी, सीबीआय, इन्कॅमटॅक्स यांचा गैरवापर याबाबत टिका केली. 


 
Top