भूम (प्रतिनिधी)- अमृत योजनेचे काम बंद करा अन्यथा रस्ता रोको व भूम शहर बंद करणार असल्याचे सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
भूम नगर परिषदे अंतर्गत शहरांत अमृत-2 वाढीव पाईप लाईन योजनेचे काम करण्यात येत आहे. सदरील पाईप लाईनचे काम करण्यासाठी गेल्या वर्ष भरा पूर्वी करण्यात आलेले सिमेंट रस्ते पेव्हर ब्लॉक, डांबरी रस्ते जेसीबी व ब्रेकर च्या सह्याने फोडले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्त्याला व घराना भेगा पडल्या आहेत. भूम नगरपरिषद मार्फत सन 2008 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग धाराशिव यांच्या अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा नळ योजना पूर्ण झालेली आहे. या योजनेअंतर्गत पुढील 30 ते 40 वर्षात भूम शहराला योग्य रीतीने पाणीपुरवठा केला जाऊ शकत होता. भूम शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन तलाव आहेत. मानगंगा मध्यम प्रकल्प, आरसुली मध्यम प्रकल्प या तलावातून शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जातो. तसेच त्यातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता हरसोली मध्यम प्रकल्पात वाशी शहरासाठी ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सध्या भूम शहरात सर्व प्रभागात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. तो नागरिकांना पुरेसा आहे असे असताना मात्र भूम शहरातील नागरिकांवर अमृत योजना -2 सारखा पाणीपुरवठा योजना लादली जात आहे. या योजनेमुळे गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अमृत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कनेक्शनला मीटर बसवणे हे बंधनकारक असल्याचे जीआर मध्ये नमूद केले आहे. तसेच ही योजना पूर्ण झाल्यानंतर झालेल्या योजनेचा खर्च, व दुरुस्ती देखभाल याचे नियोजन करून कर प्रणाली आकारली जाणार आहे. भूम शहराच्या आसपास आरसोली व बाणगंगा तलाव असूनही केवळ नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे काही भागात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे भूम शहरातील सर्वपक्षीय व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून दिनांक 29 मे 2025 रोजी पर्यंत अमृत योजनेचे काम बंद न केल्यास रस्ता रोको करून भूम शहर बंद ठेवले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष विजय सिहं राजे थोरात, परंडा भाजप विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, उबाटा गटाचे माजी शहर प्रमुख दीपक मुळे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, माजी बाजार समिती चेअरमन रमेश तात्या मस्कर, राष्ट्रवादी सामाजिक सेल चे गणेश साठे, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष गवळी काका, भाजप नेते प्रदीप साठे, आबासाहेब मस्कर, पॅन्थर सेनेचे चंद्रमणी गायकवाड, फेरोज बागवान, पिंटू माळी पाटील, पत्रकार विहंग कदम, वडार समाजाचे नेते दीपक पवार, महादेव जाधव तसेच भूम शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.