धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली आज 13 मे 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता धाराशिव येथील एस.टी.बस स्थानकावर मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले.बस डेपोमध्ये बसने अचानक पेट घेतल्याची आपत्कालीन परिस्थिती उभी करून,त्या अनुषंगाने विविध यंत्रणांची तयारी तपासण्यात आली.
ही माहिती आगार व्यवस्थापक श्री. बालाजी भांगे यांनी पोलिस नियंत्रण कक्ष,निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय,108 रुग्णवाहिका सेवा, अग्निशमन दल व होमगार्ड यांना दिली. यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवली. तर 108 रुग्णवाहिका व पोलिस दलानेही तत्पर प्रतिसाद दिला.
या मॉकड्रिल प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,“कोणत्याही आपत्तीमध्ये संयम व धैर्य राखणे अत्यावश्यक आहे. प्रशासन सज्ज राहण्यासाठी या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले असून ते यशस्वीरीत्या पार पडले आहे.
या मॉकड्रिलला विभागीय वाहतूक अधिकारी एस.टी.महामंडळाचे अभय देशमुख,उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,महसूल तहसीलदार अभिजीत जगताप, बीडीडीएस पथक, होमगार्ड पथक, जिल्हा शोध व बचाव कार्य टीम तसेच एस.टी.महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आपत्तीच्या काळात यंत्रणांचे सुसूत्री व समन्वित कार्य महत्त्वाचे असते हे या मॉकड्रिलद्वारे अधोरेखित झाले.