धाराशिव (प्रतिनिधी)- मंगळवार दि. 13 मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या दहावी परिक्षेच्या निकालामध्ये लातूर विभागात धाराशिव जिल्ह्याचा 95.37 टक्के निकाल लागल्याने धाराशिव जिल्हा प्रथम आला आहे. बारावी परिक्षेच्या निकालामध्येही लातूर पॅर्टन मागे टाकत धाराशिव जिल्हा लातूर विभागात प्रथम आला होता.
लातूर विभागात धाराशिव जिल्ह्याचा निकाल 95.37 टक्के लागला. तर लातूर जिल्ह्याचा निकाल 92.36 टक्के लागला. आणि नांदेड जिल्ह्याचा निकाल 91.93 टक्के लागला आहे. त्यामुळे शिक्षणाची पंढरी समजला गेलेला लातूर जिल्हा निकाल मागे पडला आहे. धाराशिव जिल्ह्यात 21 हजार 748 मुलांनी परिक्षा फॉर्म भरले होते. त्यापैकी 21 हजार 411 मुले परिक्षेला बसली होती. त्यापैकी 20 हजार 228 मुले पास झाली. जिल्ह्यात पास होण्याचे प्रमाण मुलींमध्ये अधिक असून, 97.37 टक्के मुलीं उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल 92 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षी कॉपीमुक्त अभियान मोठ्या प्रमाणात राबविले होते. तर कॉस सुपरविझनची योजनेची अंमलबजावणी केली होती.
वर्षभर सराव
जिल्ह्यात दहावी परिक्षेबाबत वर्षभर सराव परिक्षा घेण्यात आल्या. कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे राबविले. कॉस सुपरविझनला शिक्षक संघटनेचा विरोध असतानाही ती योजना अंमलात आणली. त्यामुळे जिल्ह्याचा निकाल परिश्रम घेतल्याप्रमाणे चांगला लागला.
सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धाराशिव