धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र करावयाचे आहे. तुळजापूर शहर आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी 1866 कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती व मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. आता त्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करणे अत्यावश्यक आहे.  पुढील तीन वर्षाच्या हा विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करून कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करा.  तसेच तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश आमदार तथा मित्रचे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुंबईतील निर्मल येथे असलेल्या 'मित्र'च्या कार्यालय तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत तातडीने महत्वाची बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी कालबद्ध कृती कार्यक्रमाची तातडीने आखणी करण्याबाबत सूचना दिल्या. यात प्रामुख्याने मंदिर जीर्णोध्दाराचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे ठरले आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा पहिला टप्प्यात भूसंपादन प्रक्रिया करण्याचे या बैठकीत ठरले आहे.  

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे 6 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  तुळजापूर विकास आराखड्यास राज्य सरकारच्या शिखर समितीकडून अंतिम मान्यता दिली होती.त्यानंतर याविषयी तातडीने मुंबईतील निर्मल भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विकास आराखड्यातील कामांना गती येण्याच्या अनुषंगाने यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा देण्याबाबतही बैठकीत प्राधान्याने चर्चा करण्यात आली. तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेवून भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. अंतिम मंजुरी देण्यात आलेल्या विकास आराखड्यात 30 %  आर्थिक तरतूद केवळ भूसंपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र विकासासाठी संपादीत केली जाणार आहे, त्यांना समाधानकारक आणि रास्त मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेवूनच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा व स्थानिक आर्थिक समृद्धी आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. याप्रसंगी पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश आहिरराव, सहाय्यक संचालक श्रीमती जया वाहणे, तहसिलदार अरविंद बोळंगे, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, वास्तुविशारद  हेमंत पाटील आणि तांत्रिक सल्लागार तेजस्वीनी आफळे यांची उपस्थिती होती.

 
Top