भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील साडेसांगवी शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुमचे नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी चालक, टिप्पर चालक यांच्यासह सुमारे दहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुमचे नायब तहसीलदार प्रवीण दिलीप जाधव (वय 31) हे 1 मे 2025 रोजी मध्यरात्री 12:05 ते 1:00 वाजण्याच्या सुमारास आपल्या पथकासह साडेसांगवी शिवारातील आण्णा मासाळ यांच्या घराजवळील बाणगंगा नदी पात्रात गस्त घालत होते. यावेळी नदीपात्रातून सुमारे 20 ब्रास अवैध वाळू (अंदाजे किंमत 1,20,000 रुपये) चोरून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रयत्न पथकाने केला. मात्र, यावेळी उपस्थित जेसीबी चालक, टिप्पर चालक आणि इतर सुमारे दहा अनोळखी इसमांनी एकत्र येऊन नायब तहसीलदार जाधव व त्यांच्या पथकावर दगडफेक केली. या हल्ल्यामुळे पथकाला कारवाई मागे घ्यावी लागली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

या घटनेप्रकरणी नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांनी 2 मे 2025 रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक, टिप्पर चालक आणि इतर दहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 132 (चोरी), 125 (शासकीय कामात अडथळा), 303(2) (गंभीर दुखापत किंवा हल्ला), 189(2) (बेकायदेशीर जमाव), 191(2) (दंगल), 190 (सरकारी कर्मचाऱ्यास धाक दाखवणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भुम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 
Top