धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय विद्यालय स्थापनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित झालेल्या धाराशिवमध्ये केंद्र शासनाच्या मानकांनुसार गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय विद्यालय स्थापन करणे करिता शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती. तसेच लोकसभेच्या अधिवेशन काळामध्ये या संदर्भामध्ये तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. या अनुषंगाने केंद्रीय विद्यालय संघटन यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
या बैठकीत धाराशिवचे लोकप्रतिनिधी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय विद्यालयाची निकड अधोरेखित केली असून, या शाळेमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालक यांना मोठा दिलासा मिळेल, असे मत व्यक्त केले. त्यांनी केंद्र शासनाच्या पातळीवर प्रस्ताव त्वरित मंजूर होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले. या बैठकीत जिल्ह्यातील विविध ठिकाणची संभाव्य शासकीय व निमशासकीय जागा तपासून त्यातील योग्य ठिकाण निश्चित करण्याचा विचार विनिमय करण्यात आला. तसेच केंद्रीय विद्यालय संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्ताव तयार करून त्वरित केंद्र शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह ,सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, नगरपरिषद, महसूल विभाग यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.