धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 100 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शिवारात स्मार्ट 'पीआयएस' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रीम बुद्धिमत्ताचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाकडून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोमवारी जिल्ह्यातील शेतकरी याअनुषंगाने राहुरी विद्यापीठात अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्ससारख्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प आपण हाती घेतला आहे. त्याला राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सहकार्य करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकतीच भेट दिली. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) या राज्यशासनाला आर्थिक व धोरणात्मक दिशा देणाऱ्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्प व प्रयोगशाळांचा आढावा घेतला आणि शास्त्रज्ञांशी संवादही साधला. राहुरी कृषी विद्यापीठाने कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानावर मोलाचे काम केले आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आवश्यक आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या 'स्मार्ट पी. आय. एस.' सेन्सर बेस सिंचन तंत्रज्ञानाचा वापर धाराशिव जिल्ह्यात आपण यशस्वीपणे करण्याचा काटेकोर प्रयत्न करीत असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. सध्या शेतकरी बांधवांना मिळणारा पीकविमा उत्पन्नाधारीत आहे, तो उत्पन्नाधारीत असायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या भेटीचे आयोजन राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुनील कदम, डॉ. विक्रम कड, डॉ. तुळशीदास बास्टेवाड, डॉ. योगेश सैंदाणे, डॉ. भगवान देशमुख, डॉ. सचिन सदाफळ, प्रा. अन्सार अत्तार आणि डॉ. सचिन मगर,डॉ.भगवान देशमुख यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली.
कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पन्न वाढीसाठी सशक्त पर्याय
एआय तंत्राद्वारे पिकांमध्ये अचानक होणारे बदल, खतांची उपलब्ध व आवश्यक मात्रा, पाण्याचे प्रमाण, हायपर स्पेक्ट्रल कॅमेऱ्याच्या मदतीने रोगकिडीचा होत असलेला व संभाव्य प्रादुर्भाव या साऱ्या माहितीचे संकलन होऊन पिके अधिक कार्यक्षम व उत्पादनक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होते. जमीनीच्या वरचा भाग आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, मात्र जमीनीखालच्या भौतिक व रासायनिक बदलांची माहिती वारंवार व तातडीने देऊन त्या ठिकाणी होत असलेल्या भविष्यात पिकांच्या येऊ घातलेल्या अडचणींवर वेळीच उपाय शोधता येणार आहे. त्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न दोन्हीत कमालीची वाढ अपेक्षित असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.