धाराशिव (प्रतिनिधी)-  लहान वयातील बालकांचे आरोग्य सुरळीत राहावे यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय असून,अनेक गंभीर आजारांपासून बालकांचे संरक्षण करण्यात लसीकरणाची महत्त्वाची भूमिका असते. याच अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. नवजात बालकांपासून ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये होणारे विविध आजार लसीकरणामुळे टाळता येतात. हे लक्षात घेता प्रत्येक पालकाने आपली मुले वेळेवर आणि पूर्ण लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी केले आहे.

लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या आजारांमध्ये ॲक्युट फ्लासिड पॅरालिसिस, संशयित गोवर-रुबेला,संशयित घटसर्प,संशयित डांग्या खोकला, संशयित नवजात धनुर्वात  यासारख्या आजारांचा समावेश होतो.या आजारांमुळे मुलांचे आरोग्य गंभीरपणे बाधित होऊ शकते,तर काही वेळा जीवघेणाही ठरू शकतो.त्यामुळे वेळेवर लस घेणे ही केवळ आरोग्याची काळजी घेण्याची नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारीही आहे.

जिल्हा आरोग्य विभागाकडून विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असून, प्रत्येक पालकाने आपल्या भागातील सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क करून आपल्या मुलांचे लसीकरण संपूर्ण झाले आहे की नाही,याची खातरजमा करावी. यासाठी सरकारी रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे,अंगणवाडी केंद्रे व आशा कार्यकर्त्यांमार्फत माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.


 
Top