धाराशिव (प्रतिनिधी)-  महावितरण आणि वीजग्राहक यामधील लाईनमन हा अत्यंत महत्वाच दुवा आहे. महावितरणचा तो चेहरा आहे. त्यामुळे लाईनमनच्या वर्तणुकीवरच कंपनीचे यश अवलंबून आहे. त्यामुळे ग्राहकहीत जोपासतच लाईनमननी ग्राहकाभिमूख सेवा द्यावी. असे निर्देश महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) धनंजय औंढेकर यांनी दिले.

धाराशिव येथे लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सुसंवाद मेळाव्यात धाराशिव जिल्ह्यातील जनमित्र, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना औंढेकर म्हणाले की, वीजग्राहकांना अखंडीत वीज सेवा दिली तर वीजग्राहक आपल्यापासून दुर जाणार नाही. परिणामी आपण विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनीटची वसुली करणे सोपे जाते. सेवेप्रति निष्ठावान असलेल्या काही लाईनमनची उदाहरणे देत लाईनमन कसा असावा व कसा असू नये याविषयी मार्गदर्शन केले. तसेच लाईनमनचा गणवेश हा अत्यंत महत्वाचा असून त्यामुळे तूमच्याकडे पाहण्याची एक वेगळा दृष्टी वीज ग्राहकांमध्ये निर्माण होते. मार्च महिन्यात केलेल्या वीजबील वसुलीचे कौतूक करत, केवळ एका महिण्याच्या कामगिरीवर समाधान मानून चालणार नाही. प्रत्येक महिना हा मार्च समजूनच प्रत्येकाने कार्यरत रहायला हवे अशाही सूचना केल्या. त्याचबरोबर 15 मे पर्यंत 33 केव्ही 11 केव्ही वीजवाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांदयांची रितसर परवानगी घेवून छाटनी करून घ्यावी. आपली वीजवाहिनी ट्रीप होते की नाही याची संबधीतांनी काळजी घ्यायला हवी. लाईनमनच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व कर्मचाऱ्यांना टीएनटी, रेनकोट, गमबुट, रबरी हातमोजे व पोर्टेबल शिडी देण्याचे आश्वासन औंढेकर यांनी याप्रसंगी दिले. सुसंवाद मेळाव्यास धाराशिव मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते तसेच मानव संसाधन व लेखा विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 
Top