धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातल्या डीपी रस्त्याच्या कामाच्या निविदेबाबत नगर विकास खात्याने काढलेला आदेश हा आमच्या आंदोलनाला आलेले यश असल्याचा खोटा दावा उबाठा गट करीत सुटला आहे. धूळफेक करण्यात ही मंडळी माहीर आहे. वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंदाजित दरापेक्षा अधिकच्या दराच्या निविदांना मंजुरी न देता अंदाजपत्रकात नमूद केलेल्या दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने राज्यात सगळीकडे नगरविकास विभागाची कामे करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. हा आदेश केवळ धाराशिव शहरापुरता असल्याचा कांगावा करण्यात उबाठा गट धन्यता मानून आंदोलनामुळेच हे यश आल्याचा खोटा दावा करीत सुटले आहेत. त्यांचा दावा म्हणजे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असून, आंदोलन टक्केवारीसाठी की जनतेसाठी केले लवकरच पुराव्यानिशी उघडकीस आणणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, अमित शिंदे, अभय इंगळे यांनी दिली आहे.
मुळात नगरोत्थान योजनेतंर्गत असलेली ही कामे राज्यातील अन्य शहरात जवळपास पूर्ण होत आली आहेत.आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात धाराशिव शहर नसताना जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मोठा पाठपुरावा करून या कामासाठी खास बाब निधी मंजूर करून घेतला आहे.तुम्ही मात्र यासाठी कांहीही न करता यात टक्केवारीसाठी खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले.आपल्याच धाराशिव शहरातील या सर्व कामांना उशीर का झाला..? टक्केवारीसाठी यात कोणी कशा प्रकारे खोडा घातला? जिल्ह्यात टक्केवारी वसुलीच्या विद्यापीठाचे कुलगुरू व सहकुलगुरू कोण आहेत? लवकरच पुराव्यानिशी सगळा लेखाजोखा जनतेसमोर आपण आणणार आहोत. त्यानंतर डोळे झाकून दूध पिणारे मांजर कोण आहे? आणि कुणामुळे शहरातील सगळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत याचा सगळा दस्तऐवज खुला करणार असल्याचा इशारा काकडे, शिंदे, इंगळे यांनी दिला आहे.