धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील 140 कोटी रूपयांचे 59 डिपी रस्त्यांच्या कामाचे टेंडर 15 टक्के जादा दराने मंजूर करण्याच्या घाट रचला होता. मात्र तो आता हाणून पाडला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या कामी पुढाकार घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे धाराशिव नगर परिषदेचे 22 कोटी रूपये वाचणार आहेत. नगर परिषद प्रशासन संचालनालयाने कंत्राटदाराशी वाटाघाटी करून अंदाजप्रत्रक दराने निविदा निकाली काढाव्या. अन्यथा निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
23 फेब्रुवारी 2024 रोजी 59 डीपी रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळाला होती. 1 वर्ष होवूनही या कामाची निविदा उघडली नाही. या विषयी महाविकास आघाडीने अनेकदा आंदोलने केली. तरीही दखल न घेतल्याने 28 एप्रिल रोजी शहरप्रमुख सोमनाथ गुरव, रवि वाघमारे, सरफराज काझी यांनी आमरण उपोषण केले. त्यांची तिसऱ्या दिवशी पालकमंत्री सरनाईक यांनी दखल घेवून भेट घेतली. पालकमंत्री यांनी या संदर्भात स्पष्ट आश्वासन दिले. त्यामुळे आमरण उपोषण पालकमंत्री यांच्या हस्ते सुटले. त्यानंतर नगर परिषद संचालनालयाने मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले. या पत्रात दिलेल्या प्रशासकीय मंजुरींच्या अंदाजपत्रकीय दरापेक्षा 15 टक्के जास्त आहे. अंदाजपत्रकीय दराने काम करण्याबाबत कंत्राटदारांशी वाटाघाटी कराव्या. त्यांनी तयारी न दाखविल्यास फेर निविदा मागविण्याची सुचना आयुक्तांनी दिल्या आहेत. या कामासाठी स्वःहिस्सा ठराव पाठवून देण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत.