धाराशिव (प्रतिनिधी) - येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या वतीने या ही वर्षी शुक्रवार, २ मे २०२५ रोजी सामुदायीक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये २३ बटूवर उपनयन संस्कार करण्यात आले.
धाराशिव येथे ब्राह्मण कल्याण ट्रस्ट ही सामाजिक संघटना मागील ७ वर्षापासून सामुदायीक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहे. या वर्षी शुक्रवार, २ मे रोजी शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.४४ वाजता शहरातील मान्यवर पुरोहित वर्गाच्या मंत्रोच्चारात धाराशिव जिल्ह्यासह परिसरातील २३ बटूवर उपनयन संस्कार करण्यात आले. ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून या सामुदायीक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
बटूंना आर्शिवाद देण्यासाठी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, उर्मिला गजेंद्रगडकर, जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, श्री. सिध्दीविनायक परिवाराचे अध्यक्ष तथा भाजपा नेते दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देवीदास पा'क, उद्योजक संजय शेटे यांच्यासह विविध संघटनाचे प्रतिनिधी, मान्यवर उपस्थित होते.
धाराशिव शहरातील वेदशास्त्र संपन्न असलेल्या २५ पुरोहितांनी २३ बटूंवर सर्व विधीवत संस्कार केले, तसेच धाराशिव शहरातील वेदपाठशाळेमधील १० विद्यार्थी व सर्व पुरोहितांनी बटूंना चारी वेदांच्या मंत्रांचे आशीर्वाद दिले. हा उपनयन संस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.