धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पत्रकारांशी सौहार्दपूर्ण संवाद साधला. या संवादात कुलकर्णी यांनी सांगितले की, 2016 ते 2020 या काळात मी जिल्हाध्यक्ष होतो, आणि आता पक्षाने पुन्हा ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मन:पूर्वक आभार. आगामी काळात संघटनात्मक कामकाज अधिक बळकट करून, कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील असे दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले. 

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी काळे, ॲड. नितीन भोसले, सतीश दंडनाईक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, माझ्या मागील कार्यकाळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पार पडल्या होत्या. यात आम्हाला बऱ्यापैकी चांगले यश मिळाले होते. आज केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. धाराशिवात आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील अशा सक्षम नेत्यांचा संच माझ्याजवळ आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संघटन मजबूत करणार आहे,“ असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचे प्रबोधन, बूथ स्तरावरील बांधणी व संपर्क अभियानाच्या माध्यमातून कार्य विस्तार करण्यावर भर राहणार असल्याचे सांगून त्यांनी पुढे नमूद केले की, “ज्यांच्यासोबत मी आज काम करतो आहे, त्यापैकी एखादा कार्यकर्ता उद्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी पोहोचावा, ही माझी इच्छा असल्याचे सांगितले.


 
Top