धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालास अखिल भारतीय आयुर्विमा संस्था अर्थात नागपूर एम्सच्या सहकार्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. त्यामुळे धाराशिवकरांना आता 'एम्स'कडून अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एम्सच्या तंज्ञांकडून अद्ययावत वैद्यकीय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. नागपूर 'एम्स'आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबत काम करणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
वैद्यकीय क्षेत्रात देशात नावाजलेल्या एम्सचे मार्गदर्शन आता आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देत धाराशिवकरांना 'एम्स'च्या तंज्ञांची वैद्यकीय सेवाही लाभणार आहे. नागपूर 'एम्स'चे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत जोशी यांनी धाराशिवच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दोन्ही संस्थांमधे अधिकृतपणे एकत्रित काम करण्या बाबत ठरल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. 'एम्स'चे तज्ञ धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा व वैद्यकीय शैक्षणिक विकासासाठी 'हँड होल्डिंग'ची महत्वपूर्ण भूमिका पार पाडतील. या निर्णया मुळे 'एम्स'चे नागपूर आता वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवसाठी रेफरल सेंटर म्हणून कार्य करणार आहे.
22 मे पासून प्रारंभ
22 मे रोजी त्याची अधिकृत सुरुवात होत आहे. 'एम्स'चे प्राध्यापक दुरदर्शीप्रणालीच्या माध्यमातून डॉ. प्रथमेश कांबळे 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेंदू-संगणक : संवाद यंत्रणा, नव कल्पना, आव्हाने आणि भविष्यातील क्षितिजे' या विषयावर पाहिले लेक्चर घेणार आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्णांना आता नागपूर येथे सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. नागपूर येथील 'एम्स' ही संस्था महाराष्ट्रातील अद्ययावत व आधुनिक उपचार पद्धतीने युक्त अशी एकमेव वैद्यकीय संस्था आहे. धाराशिव, नागपूर दरम्यान उपलब्ध परिवहन, रेल्वे सेवा तसेच समृद्धी महामार्गामुळे दोन्ही शहरातील अंतरही आता कमी वेळेत गाठता येणार आहे. त्यामुळे अंतररूग्ण सेवेसाठी ही बाब आणखी सोईस्कर ठरणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.