तुळजापूर (प्रतिनिधी)-  काळाच्या पटलावर राजमाता आहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आलेख कोरला आहे. आहिल्यादेवी या खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाचे अमूल्य असे प्रेरणास्थान आहेत. तुळजापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे. हे केवळ स्मारक नसून त्याठिकाणी अद्ययावत प्रेरणा केंद्र आणि मदत केंद्रही उभारण्याची योजना असल्याचे सांगत लोकसहभागातून पुतळा उभारणीसाठी निधी संकलनाची सुरुवात म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवारी एक लाख रुपयांचा सक्रिय सहभाग दिला.

पुण्यश्लोक राजमातांच्या भव्य स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. त्यातूनच हे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकात केवळ पुतळाच नव्हे, तर प्रेरणा  केंद्र आणि मदत केंद्रही उभारण्याची योजना आहे. यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. याप्रसंगी पुतळा हा लोकसहभागातून उभा करण्याचा निर्धार करण्यात आला व लोकसहभागातून निधी संकलनही सुरू करण्यात आले. प्रारंभी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः 1 लाख रूपयांचा निधी देत या लोकसहभाग कार्याचा शुभारंभ केला. 


 
Top