भूम (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकामध्ये ज्ञानोबा साठे वय 75 वर्षे अंदाजे या व्यक्तीचा एसटीच्या चाकाखाली चेंगरून जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. 31 रोजी सकाळी घडली. ज्ञानोबा साठे यांना ही घटना घडल्यानंतर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भूम येथे दाखल करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूम ते वाशी या फेरीसाठी बस स्थानकात एम एच 14 बी टी 1628 या क्रमांकाची एसटी आली होती. चालक तेजस चौधरी ती एस.टी. बस स्थानकात व्यवस्थित लावत असताना ज्ञानोबा साठे हे त्या गाडीच्या पाठीमागच्या चाकाखाली आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना काही युवकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी धाराशिव येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. साठे हे बस स्थानकाच्या पाठीमागील परिसरात राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते सतत बस स्थानकामध्येच दिसून येत होते. बस स्थानकामध्ये चालू असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही गेल्या अनेक दिवसांपसून बंद आहेत तेव्हा स्थानकातील बंद असलेले कॅमेरे ही चालू करावेत व बस स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी प्रवाशातून होत आहे.