तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे भाविक भक्तांच्या सोयीसाठी व व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून, महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी दर्शन सुविधा प्रस्तावित करण्यात येत आहेत. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राज्यपाल, न्यायालयीन न्यायाधीश, मंत्री, संसद/विधीमंडळाचे आजी-माजी सदस्य, राज्य मंत्री दर्जा असलेल्या व्यक्ती, सर्व महामंडळाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, संविधानिक आयोगाचे अध्यक्ष, भारतीय सैन्य दलातील अधिकारी व सैनिक, राज्य व केंद्र सरकारमधील अधिकारी वर्ग आदींना मोफत दर्शनाची सोय तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे.

10,000 किंवा त्याहून अधिक रक्कम अथवा वस्तू अर्पण करणाऱ्या भाविकांना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन. मंदिरातील प्रथा परंपरेनुसार मंदिरात येणाऱ्या अध्यात्मिक, धार्मिक, मानकरी व मंदिर कामकाजाशी संबंधित व्यक्तींना नि:शुल्क दर्शन. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती, महाराष्ट्र व इतर राज्यातील मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त यांना नि:शुल्क दर्शन. 

दिव्यांग (अस्थीव्यंग व अंध), स्तनदामाता व मदतनीसाशिवाय चालू न शकणाऱ्या वयस्कर व्यक्तींना नि:शुल्क दर्शन. केंद्र व राज्य शासनाच्या सेवेतील वर्ग 1 चे सर्व प्रशासकीय अधिकारी कुटुंबासह आल्यास चार  व्यक्तींपर्यंत नि:शुल्क दर्शन, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी रु. 200 देणगी शुल्क आकरण्यात येईल. तर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त सदस्य, मंदिर व्यवस्थापक यांच्या शिफारशीने आलेल्या व्यक्तींना 200 रूपये देणगी शुल्क आकारण्यात येईल.



पत्रकारांचा उल्लेख नाही

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रत्येक कार्यक्रमास ठळक प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकरांना मात्र कोणतीही सुविधा देण्यात आली नाही. अथवा त्यांचा उल्लेख कोठेही करण्यात आला नाही. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार जिल्हाधिकारी यांच्यासह तुळजाभवानी मंदिर विश्वस्तांकडे पत्रकारांसाठी विशेष दर्शन व्यवस्था असावी अशी मागणी करीत आहेत. परंतु त्यास कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देण्यात आला नाही. 


 
Top