धाराशिव  (प्रतिनिधी) - धाराशिव शहरातील एका मुलीची काही गुन्हा नाही छेडछाड केली होती. याचा जाब मुलीच्या भावाने संबंधितांना जाऊन विचारला. त्याचा राग मनात धरून त्याच्या घरातील गुंड प्रवर्तीच्या मंडळींनी संगणमताने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्या भावास एकट्याला गाठून काठीने अमानुष मारहाण केली. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र अद्यापपर्यंत मुख्य आरोपीसह फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा. संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे सीडीआर तपासण्यात यावे. तसेच सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आर्त मागणी मयताच्या आई, वडील, बहीण व नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे दि.१९ मे रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.८ मे रोजी धाराशिव शहरातील जुन्या गल्लीतील सागर चौधरी हा किशोर चौधरी यांच्या घरी येऊन शिवाजी सिमप्पा इटलकर यांच्या मुलीची छेडछाड करीत होता. त्यांचा मुलगा म्हणजे त्या मुलीचा भाऊ मारुती इटलकर याने याचा जाब चौधरी यास विचारण्यास गेला असता रणजीत चौधरी यांच्या सांगण्यावरून सागर चौधरी प्रवीण चौधरी किशोर चौधरी अंकुश चौधरी व सिद्धनाथ सावंत यांनी संगणमत करून मारुती इटलकर यास अमानुष बेदम मारहाण केली. त्यांनी केलेल्या मारहाणीत मारुती जबर जखमी झाला. त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याची तक्रार घेण्यास धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिरंगाई केली. घटना घडल्यापासून तीन दिवसापर्यंत पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. मात्र प्रेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून ठेवताच अवघ्या काही क्षणात त्यांनी आरोपींना कसे पकडले  ? तसेच पोलिसांनी आरोपींशी संघटनात करून मयत मारुतीचे वडील यांच्यावरच खोटी तक्रार पोलिसांनी घेऊन खोटा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ज्या मुलीची छेडछाड केली. त्या पीडित मुलीस शेहर पोलीस ठाण्याच्या पुरुष पोलिसांने घटनास्थळी नेऊन दबाव टाकून नको नको ती विचारणा करून मुलीला अतिशय अतिशय लज्जास्पद वागणूक दिली. मात्र ती विचारणा महिला पोलिसांनी करणे बंधनकारक असताना देखील महिला पोलिसांकडून का केली गेली नाही ? घटना घडल्यापासून शहर पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी आरोपींना वाचविण्यासाठी कोणाच्या संपर्कात होते ? पोलिसावर कोण राजकीय दबाव आणीत आहेत ? विशेष म्हणजे या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला व इतर फरार आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा. शहर पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांचा सीडीआर तपासण्यात यावा. तसेच सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आर्त मागणी पीडित इटलकर कुटुंबाने केली आहे. या निवेदनावर वडील शिवाजी शिमप्पा इटलकर, आई आशा इटलकर, विजय चौगुले,  पंडित चौगुले, महादेव इटलकर, सिमप्पा इटलकर, पूजा इटलकर, आरती इटलकर, तनुजा इटलकर, सुमनबाई इटलकर आणि राधा इटलकर यांच्या सह्या आहेत.

 
Top