धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील बायपास रोडलगत सुरु असलेल्या सर्विस रोड, नाली व पथदिव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि.18) शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा निकृष्ट दर्जा आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना तातडीने कामाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना दिल्या.
धाराशिव शहरालगत पोदार स्कूल ते अभियांत्रिकी महाविद्यालय या मार्गावर दोन्ही बाजूला सर्विस रोडचे काम सुरु आहे. शहरालगत हा रस्ता असल्यामुळे या मार्गावरुन नागरिकांना दररोज ये-जा करावी लागते. या भागात नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात असून सर्विस रोडलगत रहिवासी क्षेत्र, दवाखाने,मंगल कार्यालय, पेट्रोल पंप, शाळा आहेत. परंतु रस्त्याचे काम करत असताना नाल्यांची उंची वाढविण्यात आलेली असल्यामुळे सर्विस रोडवर येताना किंवा वळताना नागरिकांची मोठी अडचण होत आहे.नालीची उंची रोड च्या लेव्हल ने करून नागरिकांची गैरसोय टाळवी अशा सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर सर्विस रोडलगतचे विद्युत पोल देखील वेडेवाकडे उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आ.कैलास पाटील यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसमवेत सर्विस रोड, नाली व विद्युत पोलच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ हे काम दर्जेदार करावे, नालीची उंची कमी करुन विद्युतपोलच्या कामाबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर नागरिकांना सर्विस रोडच्या कामाबाबत तक्रारी असल्यास आपणाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवासेना शहरप्रमूख रवि वाघमारे, प्रवीण कोकाटे,पंकज पाटील, उमेश राजेनिंबाळकर, ॲड.निलेश बारखेडे, राज निकम, महेश शेरकर, ऋषिकेश धाराशिवकर, ॲड. पवन इंगळे, प्रदीप साळुंके, अक्षय खळदकर शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.