नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा व नळदुर्ग शहरी भागातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसारखी शासकीय योजनांचा लाभ मिळावा. या मागणीसह नागरी सुविधा सह शेतीविषयक समस्या दूर करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष इमाम शेख यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिनांक 16 मे रोजी येथील नगरपालिका कार्यालयात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष इमाम शेख यांनी एका लेखी निवेदनाद्वारे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन दिले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नळदुर्ग शहर हे ऐतिहासिक शहर असून लोकवस्ती युक्त शहर आहे. या शहराला गेल्या अनेक वर्षापासून तालुका निर्मितीची मागणी होत आहे. दरम्यान या मागणीचा विचार करून आमदारांनी नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर शहरातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्याप्रमाणे शासकीय योजनांचा लाभ मिळावा. शंभर टक्के विहीर अनुदान, शेततळे, कुंपण, कोपरा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना आदी योजनांचा लाभ नळदुर्ग हद्दीतील शेतकऱ्यांना मिळावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा होण्यासाठी सिंगल फेज योजना मिळावी. यासाठी आपण प्रयत्न करावा अशी ही मागणी इमाम शेख यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज जोडण्यासाठी येणाऱ्या अडचणीवरही इमाम शेख यांनी यावेळी प्रकाश टाकला. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना ज्या काही सुविधा मिळत आहेत त्या सुविधा गैरसूच्या असून चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळत नसल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून आपल्या निवेदनात व्यक्त केल्या आहेत. दरम्यान नळदुर्ग शहरातील रस्त्याची ही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यावर ही त्यांनी प्रकाश टाकीत नळदुर्ग शहरातील शास्त्री चौक ते किल्ला गेट, त्याचबरोबर शहरातील चावडी चौक ते बोरी घाट, बोरघाट ते किल्ला गेट आणि इतर रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावे. अशीही मागणी यावेळी शेख यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे केली. यावेळी आमदार राणाजगदीशसिंह पाटील यांनीही निवेदनातील मागण्याचा जरूर विचार करून तात्काळ त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी इमाम शेख यांच्यासह उपस्थितांना दिले.