उमरगा(प्रतिनिधी)-  लाडक्या बहिणीला मुंबईला पाठविण्यास उमरग्याच्या (जि. धाराशिव) बस स्थानकात आले असता एसटीबस निघून गेल्याने उद्याच्या एसटीबसने जा असे सांगून दोघे बहीण भाऊ गावाकडे परत जात असताना ऑयशर टेम्पोने बहिण, भावाला चिरडल्याने दोघे जागीच ठार झाले. ही घटना शहराजवळील बाह्यवळण रस्त्याच्या कॉर्नरजवळ शुक्रवारी (दि.16) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील कोळसूर (गुंजोटी) येथील रहिवाशी शिवाप्पा सातप्पा मगे वय 38 वर्ष हे आपली बहिण अनिता देवेंद्र माळी वय 48 वर्ष रा. हिप्परगाराव (ता.उमरगा) यांना मुंबई येथे पाठविण्यासाठी बसस्थानकात आले होते. बस नसल्याने दोघेही परत कोळसुरकडे जाण्यासाठी दुचाकीवरून  उमरगा येथून जात असताना, शहराच्या बाह्य वळण रस्त्यावर हैद्राबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑयशर टेम्पोने (क्र. एम एच 13 सी यु 1686) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक जबरदस्त होती, टेम्पोने दोघांनीही फरफटत नेले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोने दुचाकीला फरफटत तसेच तुरोरी गावापर्यंत नेले. तेथे लोकांनी टेम्पो पकडला. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिस कर्मचारी व शंतनू सगर, जाहेद मुल्ला यांच्यासह कार्यकर्त्यांनी अग्निशमन वाहन बोलावून रस्त्यावर पडलेला मृतदेहाचा चेंदामेंदा पाणी टाकुन बाजुला केला.या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे. अपघातात मयत झालेल्या अनिता यांच्या पश्चात पती, एक मुलगा एक मुलगी आहे. तर शिवाप्पा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 
Top