भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळूचा उपसा होत आहे. बाणगंगा नदीच्या पात्रात तर रात्री सोबतच दिवसाढवळ्या वाळू माफिया प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा करत आहे. शनिवार ते सोमवार या तीन दिवसांच्या काळात शासकीय सुट्टी असल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावले होते. त्याकाळात त्यांनी मोठया प्रमाणात वाळू उपसा केला. गोलेगाव शिवारात दिवसा वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार जयवंत पाटील यांना मिळाली असता महसूल व पोलिस विभागाने कारवाई केली आहे.
त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांना दिले. बहिरमल यांनी सपोनि संजय झराड, होमगार्ड व एक पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी एक जेसीबी व ट्रॅक्टर ताब्यात घेतला. मात्र या दोन्ही वाहनांचे चालक त्या ठिकाणाहून पळून गेले. यावेळी ही वाहने येथून माती उत्खनन करत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ते माती कोठे टाकत होते. प्रशासनाची परवानगी घेतली आहे काय हे विचारले असता संबंधितांना काही सांगता आले नाही. बहिरमल यांनी तहसीलदार जयवंत पाटील यांना ही माहिती दिली असता हि वाहने त्यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले.