तुळजापूर (प्रतिनिधी)- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 'विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यात 17 ते 19 मे 2025 या कालावधीत 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. 23 देशांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संप्रदायांचे संत-महंत, मंदिरांचे विश्वस्त आणि 25 हजारांहून अधिक साधक उपस्थित राहणार.
गोवामध्ये होणाऱ्या या महोत्सवात भाविक, राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी तुळजापूर येथून 50 हून अधिक हिंदू सहभागी होणार आहेत. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा भव्य लोकोत्सवास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग'चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापकप.पू. योगऋषि स्वामी रामदेव, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, 'सनातन बोर्ड' चे प्रणेते पूज्य देवकीनंदन ठाकूर महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. सनातन राष्ट्रासाठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञाद्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार आहे.
‘हिंदु राष्ट्ररत्न' आणि 'सनातन धर्मश्री' पुरस्कार वितरण !
वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणाऱ्या हिंदूवीरांना 'हिंदु राष्ट्ररत्न' हा जीवनगौरव पुरस्कार, तसेच धर्मासाठी लढणाऱ्या धर्मरक्षकांना 'सनातन धर्मश्री' हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे, तसेच सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
संतांच्या पादुकांचे दर्शन !
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहा हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. याच समवेत या महोत्सवात 1 हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी सर्वांना मिळणार आहे. 19 मे या दिवशी विश्व कल्याणार्थ तथा सनातन धर्मीयांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरी यज्ञ होणार आहे.