धाराशिव (प्रतिनिधी)- दहावी बारावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम करावे असे प्रतिपादन धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले, त्या धाराशिव येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा धाराशिवच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सिनेट सदस्य तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक , शहराध्यक्ष प्राध्यापक प्रशांत गुरव, श्री साई श्रद्धा क्लासेसचे प्राध्यापक सोमनाथ लांडगे, विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री स्वप्निल बगाडे, धाराशिव जिल्हा संयोजक वैष्णवी थिटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार जाधव पुढे म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या अंगी सामाजिक विषयांबद्दल संवेदनशीलता असायला हवी ,संवेदनशीलता हा विद्यार्थ्यांचा स्थायीभाव असायला हवा, नाही रे वर्गासाठी काम करण्याची प्रेरणा आणि समाजासाठी काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाताना पूर्वतयारी करण्याची गरज असून आव्हानांवर मात करण्यासाठी त्या मार्गातील धोके ओळखण्याची गरज आहे .आव्हानांना सामोरे जाताना मानसिक तयारी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
अभाविपचे प्रदेश सहमंत्री स्वप्निल बगाडे यांनी यावेळी विद्यार्थी परिषदेच्या अनेक आंदोलनाची उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना माहिती दिली.यात काश्मीर आंदोलन यासह अनेक राष्ट्रीय प्रश्नावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय विचारांची जडणघडण होते असे सांगितले.
सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कौशल्य युक्त शिक्षणाची संधी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी खुली झाली असून याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज व्यक्त केली. आज देशासाठी सीमेवर जाऊन लढण्याची नाही तर देशासाठी जगण्याची वेळ आली आहे असा राष्ट्रभक्ती पूर्ण व्यवहार विद्यार्थी विद्यार्थीनींनी करून विकसित राष्ट्राच्या संकल्पनेसाठी आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाविपचे शहराध्यक्ष प्राध्यापक प्रशांत गुरव यांनी केले. त्यात त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला.प्रारंभी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात धाराशिव शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसह स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.