धाराशिव (प्रतिनिधी)- विभागीय आयुक्त,छत्रपती संभाजीनगर यांच्या परिपत्रकानुसार “ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्कांबाबत“ विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
भारत सरकारच्या “आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 “ व संबंधित 2010 मधील नियमांनुसार हा उपक्रम अमलात आणला जात आहे.या अधिनियमाचा मुख्य उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळात जीवन सुसह्य, सन्मानपूर्वक व तणावमुक्त व्हावे.हा आहे.कलम 2 (7) नुसार,ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या नातेवाइकांना (पाल्यांना) वारसा किंवा स्व-अर्जित मालमत्ता हस्तांतरित केली असल्यास,त्या पाळ्यांवर त्यांचे संगोपन करण्याचे दायित्व निश्चित केले गेले आहे.संगोपनास नकार देणाऱ्या पाल्यांविरोधात,कलम 5 नुसार,सक्षम प्राधिकाऱ्यांकडे तक्रार करता येईल.अशा प्रकरणांमध्ये कलम 23 अंतर्गत संबंधित मालमत्तेवर कारवाई होऊ शकते.
या परिपत्रकाची वर्तमानपत्रे,सोशल मिडिया,तसेच गावांमध्ये दवंडी देऊन प्रभावी प्रसिद्धी करण्यात यावी,असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आदेशित केले आहे. नागरी क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली,व तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समित्या नेमण्यात याव्यात. या समित्यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेत राहण्याचे निर्देश दिले आहेत. अभियान राबविताना कोणताही ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित राहू नये व त्यांचे हक्क अबाधित राहावेत. याची दक्षता घेण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केले आहे.