धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी असतानाच काही जण खतांच्या काळ्याबाजारात गुंतले आहेत. कृषी विभागाच्या पथकाने वशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव येथील एका कुक्कुटपालन शेडमध्ये अचानक छापा टाकला असता 7 कंपन्यांचे 20 मेट्रिक टन खताचा साठा 456 पोत्यांमध्ये आढळून आला. पेरणीपूर्वीच खत माफिया सक्रिय झाले असून, मोठ्या प्रमाणात खतांचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाने शुक्रवारी दोघांविरूध्द वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही परवानगी नसलेल्या कंपनीचे खत विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव शिवारातील एका कुक्कुटपालन शेडमध्ये एका शेतकऱ्याने खताचा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती वाशी पंचायत समितीचे कृषी अधिकारी अविनाश माळी व तालुका कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक राजराम बर्वे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तालुका व जिल्हास्तरीय पथकाने अचानक छापा टाकला. शेडमध्ये थप्पी लावलेले 456 रासायनिक खतांचे पाते आढळून आले. साठवणूक केलेल्या 20 मेट्रिक खताची बाजारभावानुसार किंमत 4 लाख 61 हजार 120 रूपये आहे. लिंगी पिंपळगाव येथील दत्तात्रय लिंबराज तावरे, खामकरवाडी येथील विकास रामभाऊ होळे यांनी विनापरवाना खतांचा साठा करून ठेवल्याने त्यांच्याविरूध्द वाशी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान जप्त केलेल्या साठ्यापैकी 3 नमुने पंचासमक्ष कृषी विभागाने घेवून पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीस पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतर खत बोगस आहे की नाही, याचा उलगडा होणार आहे. खत कोठून खरेदी केले, कोठे विक्री होणार होते, याचा तपास आता पोलिस करत आहेत.