धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याची अभिमानास्पद ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूरचा आता पूर्णतः कायापालट होणार आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी आपल्या राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.1866 कोटी रूपयांच्या तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास शिखर समितीसह मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात साफ दुर्लक्ष झालेल्या या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मान्यता मिळाली आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, महायुती सरकारने मोठे पाठबळ दिल्याबद्दल राज्य सरकारचे मनापासून आभार मानत असल्याचे मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
मागील महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस तुळजापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी जीर्णोध्दाराच्या कामांची पाहणी केली होती. आराखड्याचे सादरीकरण पाहत सर्व बाबी अत्यंत गांभीर्याने जाणून घेत काही महत्वाच्या सूचनाही केल्या होत्या व तत्वतः मंजुर देखील केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे आई तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागला आहे. पुढील तीन वर्षांच्या आत ही सगळी कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
हे होणार विकास कामे
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मुख्य दर्शन मंडपासह तेथील अनुषंगिक सोयी-सुविधांचा समावेश असणार आहे. श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असतानाचा 108 फुटाचे भव्य शिल्प जाणार आहे. त्याचबरोबर घाटशीळ, सोलापूर महामार्ग, हडको आदी ठिकाणी भक्तनिवास, प्रसादालय, पुस्तकालय, भोजनालय आणि भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांचे सुसज्ज केंद्र तयार केले जाणार आहे. तसेच वाहनतळ आणि वृंदावन गार्डनप्रमाणे अत्याधुनिक उद्यानही साकारले जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृध्द व दिव्यांग भाविकांकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचाही यात अंतर्भाव करण्यात आला आहे.
भव्य कमान उभारणार
तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे. यासाठी सर्वांच्या सहमतीने हा आराखडा स्वीकारण्यात आला आहे. पुजारी, भाविक व शहरवासीयांच्या सूचनांचा अभ्यास करून त्या सर्वांचे आक्षेप आणि सूचनांचा गांभीर्याने विचार करून या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. शहरात तसेच शहराकडून सोलापूर, बार्शी, धाराशिव, औसा आणि नळदुर्ग या पाचही दिशेला जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर तुळजापूर शहराच्या प्रवेशाजवळ आकर्षक आणि भव्य कमानी बसविण्याच्या अनुषंगाने लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याचे ठरले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.