तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील श्रीक्षेञ खंडाळा गावच्या प्राचीन परंपरा असलेली “खंडाळा ते शिखर शिंगणापूर“ ही कावड पदयात्रा शिवकालीन परंपरा म्हणून ओळखली जाते. 350 वर्षापूर्वीच्या शिवकाळात सुरु झालेली कावड पदयात्रा आजही अखंडपणे सुरु आहे. या शिवकालिन परंपरा असलेल्या मानाच्या कावडींचे आज आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आगमन झाले.
सदर कावड पदयात्रा शिखर शिंगणापूर तर्फे दिलेला मानाचा आहेर सोबत घेऊन सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9.00 वा. तुळजाभवानी मंदिरात पोहोचल्या. मांसाहेब कल्पना राजे भोसले व खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शंभू महादेव देवस्थानतर्फे श्री तुळजाभवानी मातेस मानाचा आहेर (साडी-चोळी महावस्त्र) देण्यात आला.
मंदिर संस्थांतर्फे कावडीची आरती करून व कावड मानकऱ्यांकडून विधीवत स्विकारुन, महावस्त्र देवीस पूर्वपार परंपरेप्रमाणे परिधान करण्यात आला. आणलेला दवणा देवीच्या जिरेटोपात विराजमान करण्यात आला. यावेळी देविचे महंत श्री वाकोजी बुवा, मंदिराचे धार्मिक अधिकारी वाले, गायकवाड तसेच देविचे मुख्य पुजारी धनंजय पाटील, तसेच कावडीचे मानकरी अशोक पवार, संदिपान पवार, किशोर पवार, लालु पवार, संतोश काकडे, लोखंडे, ढवन, जाधव, कोकाटे, वाघे आदी खंडाळा गावचे ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.