तुळजापूर (प्रतिनिधी)- रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा निर्मितीच्या निकषांमध्ये महाराष्ट्र राज्य तब्बल पाचव्या क्रमांकावर असल्याचे सर्वेक्षणाअंती दिसून आले आहेत. प्रगतिशील राज्याच्या ऊर्जा सक्षमतेच्या दृष्टीने हे सर्वेक्षण डोळ्यात अंजन घालणारे आहे.31 मार्च 2024 पर्यंतच्या सर्वेक्षणानुसार हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या अगोदर रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा निर्मितीच्या क्षमता निकषांच्यामध्ये गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, कर्नाटक ही राज्य अग्रस्थानी आहेत.
सद्य परिस्थितीत महाराष्ट्राला रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा निर्मितीत अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. राज्यातील झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या घडामोडींमुळे वीज वापराच्या बाबतीत देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु अक्षय ऊर्जा प्रकारासह पारंपारिक ऊर्जा निर्मितीच्या निकषांच्या मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी येतो. या निकषात देखील गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहे. एकत्रित ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत महाराष्ट्रात 51 गिगा वॅट तर गुजरात मध्ये 58 गिगावॅट इतकी वीज निर्मिती होते. दिवसागणित वाढणाऱ्या विजेच्या वापरामुळे ही तफावत वाढत जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच हरित ऊर्जा प्रकारातील रिन्यूएबल एनर्जी निर्मिती वाढविणे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे.
ऊर्जा निर्मिती आणि पारेषण क्षेत्रातील तज्ञांच्या मते रिन्यूएबल एनर्जी ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त असते. त्यामुळे उपभोक्त्यांच्या खिशावरील भार हलका होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे या ऊर्जेच्या निर्मितीमुळे पर्यावरणास कुठलीही हानी होत नसल्याने ही वीज पर्यावरण पूरक असते. गुजरात राज्याच्या वाढत्या विकास दरामध्ये रिन्यूएबल एनर्जीचा वापर ही जमेची बाजू आहे. रिन्यूएबल ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या तुलनेत गुजरात राज्य महाराष्ट्र राज्यापेक्षा तब्बल दीडपट जास्त अक्षय ऊर्जा निर्माण करते. हाती आलेल्या सर्वेक्षणानुसार सध्या महाराष्ट्रात 17.5 गिगा बॅट रिन्यूएबल ऊर्जा निर्मिती होते तर गुजरात राज्यात 27.5 गिगा वॅट ऊर्जा निर्मिती केली जाते. याच कारणामुळे गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्याला वीज घ्यावी लागते. परंतु रिन्यूएबल एनर्जी निर्माण करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातच सुरू झाली तर ऊर्जा सक्षमतेच्या दृष्टिकोनातून तो मैलाचा दगड ठरेल.