धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची शानदार परंपरा धाराशिव येथे आजही मोठ्या उत्साहात जोपासली जात आहे. विविध जातीधर्मातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या जयंती उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एकात्मतेचा संदेश देणारा हा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात खास आकर्षण ठरला आहे. बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचे यंदा 32 वे वर्ष आहे. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात 27 एप्रिल रोजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात धाराशिव शहरातून भव्यदिव्य मिरवणूक काढून जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बहुजन योद्धा सामाजिक संघटना ही समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. समाजोपयोगी उपक्रम राबवत गरजू घटकांना आर्थिक मदतीचा हात देणारी ही संघटना गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय झाली आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या भीम नगर येथील गंगाधर शिंगाडे यांच्या कुटुंबात जन्मलेल्या धनंजय (नाना) शिंगाडे यांनी धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळीला चालना देण्याचे काम आजही मोठ्या जोमाने सुरू ठेवले आहे. पिताश्री गंगाधर शिंगाडे यांच्या नावाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय गंगाधर करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कलावंत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्यामुळे राज्यस्तरीय गंगाधर करंडक एकांकिका स्पर्धा आज महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना संधी देणारा रंगमंच बनला आहे. याकामी त्यांचे बंधू विशाल शिंगाडे यांचे मोलाचे योगदान त्यांना लाभत आहे.
त्याचबरोबर जयंती उत्सव समितीच्या वतीने वर्षभर रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, भूकंपग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त भागातील जनतेच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीचा हात देणारी संघटना म्हणून आज बहुजन योद्धा सामाजिक संघटनेची ओळख निर्माण झाली आहे.
बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दरवर्षी वेगवेगळ्या जातीधर्मातील व्यक्तींना स्थान. दिले जाते. गतवर्षी परवेज अहमद तर यावर्षी मुकुंद घुले यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या जोमाने जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या जयंती उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आबाल वृद्धच नाही, तर महिला भगिनी देखील मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा मिरवणूक सुरू झाल्यापासून सांगता होईपर्यंत दक्ष असते. यावर्षी देखील देशातील विविध भागातील पारंपारिक वाद्य पथकांना मिरवणुकीसाठी आमंत्रित करण्यात आले असून जास्तीत जास्त बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन योद्धा सामाजिक संघटना आणि महामानव, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.