धाराशिव (प्रतिनिधी)- 'मराठवाडा नव्हे,भारत मुक्ती संग्राम' या ग्रंथास पुणे येथील मातंग साहित्य परिषद तर्फे साहित्यिक युवराज नळे यांना उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी दिला जाणारा 2025 चा “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाड्.मय पुरस्कार“ हा मानाचा पुरस्कार पद्मश्री गिरीशजी प्रभुणे आणि जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्रासह प्रदान करण्यात आला. भारतीय विचार साधना सभागृह, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी आयोजित समारंभास आमदार अमीत गोरखे, मुकुंदराव कुलकर्णी, विलासराव लांडगे, डॉ धनंजय भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. युवराज नळे लिखित 'मराठवाडा नव्हे, भारत मुक्तिसंग्राम' या संशोधनात्मक ऐतिहासिक ग्रंथास साहित्य क्षेत्रातील मिळालेल्या या राष्ट्रीय वाड्मय पुरस्कारासह त्यांना उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आतापर्यंत स्थानिक पातळीसह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील एकूण पंधरा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल युवराज नळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.