धाराशिव (प्रतिनिधी)- कांदा, फळे जास्त काळ टिकावा व चांगला भाव मिळण्यासाठी अनुउर्जा द्वारे अन्न प्रक्रिया प्रकल्प तुळजापूर येथे 250 एकर जागेवर राबविणार असल्याची माहिती मित्र संस्थेचे उपाध्यक्ष व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

रविवारी दि. 13 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, विजय शिंगाडे आदी उपस्थित होते. पुढे माहिती देताना आमदार पाटील यांनी जगभरातील चांगले प्रकल्प राज्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून, त्यापैकी काही प्रकल्प धाराशिव जिल्ह्यात आणणार आहे. तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर संस्थानची माळुंब्रा परिसरात 250 एकर जमीन आहे. त्या जमीनवर सदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प एकूण 800 कोटीचा असून, पहिला टप्पा 100 कोटीचा आहे. मित्र संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे एकूण 5 प्रकल्प राज्यात उभा करण्याचे ठरले आहे. सध्या राहुरी, वाशी, लासलगाव या ठिकाणी कमी क्षमतेचे हे प्रकल्प आहेत. यामध्ये कांद्यावर प्रक्रिया करून जास्त दिवस टिकवता येतो. 


परदेशी मदत आणणार

केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी परदेशी गुंतवणूक आणून निर्यातक्षम शेतमाल व फळबाग बनवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात दळणवळणच्या सोयी रेल्वे, त्याप्रमाणे विविध भागातून गेलेले हायवे, त्यामुळे ड्रायपोर्ट पर्यंत वस्तू जलद गतीने जातील असेही आमदार पाटील यांनी सांगितले. 

 
Top