धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवार, 13 एप्रिल रोजी भीमजी ऑटो रिक्षा युनियन यांच्या वतीने शहरातून ॲटोरिक्षा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये 250 हून अधिक रिक्षा सहभागी झाले होते.
शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून या रॅलीचा शुभारंभ आनंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोंगे परमेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भीमजी ॲटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष अक्षय बनसोडे, उपाध्यक्ष दिनकर धावारे, कोषाध्यक्ष निशिकांत माळाले, सचिव योगेश वाघमारे सहसचिव ऋत्विक बनसोडे, मार्गदर्शक विशाल सरवदे अरुण रणखांब, जमाल तांबोळी, रोहित बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ही रॅली बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ताजमहल टॉकीज चौक, देशपांडे स्टॅन्ड, माऊली चौक, काळा मारुती चौक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव, त्रिसरण चौक, लेडीज क्लब मार्गे राजमाता जिजाऊ चौक (बार्शी नाका), माणिक चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मार्गे पोलीस मुख्यालय, महात्मा ज्योतीबा फुले चौकात आल्यानंतर फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीचे विसर्जन करण्यात आले.
या रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसह निळ्या ध्वजांनी रिक्षाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आदी महापुरुषांचा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच या रॅलीचे ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले. ताजमहाल टाकी येथे रॅलीचे स्वागत जावेद तांबोळी, त्रिशरण चौक येथे जय भीम प्रतिष्ठान भैया साहेब नागटीळे,आदींनी पुष्पहार घालून व फटाक्यांची आतषबाजी करीत केले. पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बाळासाहेब रणखांब, विशाल सरवदे, सुरेश सरवदे, संतोष कांबळे, विजय गवळी, नामदेव मस्के, समाधान वाघमारे, अमर शिंदे, राजाभाऊ गायकवाड, आदींनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.