भूम (प्रतिनिधी)- भूम येथील युवक जयसिंग पवार वय 28 वर्षे या युवकाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भूम तालुक्यातील वाकवड येथे घडली. या घटनेने भूम शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भूम शहरातील जयसिंग पवार हा युवक पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होता. रविवार दि 30 रविवार रोजी तो कामावर आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 25 ए झेड 0921 वरून निघाला होता. भूम ते सरमकुंडी फाटा दरम्यान वाकवड नजीक त्याची गाडी खराब रस्त्यावरून घसरून लगतच्या दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली. यामध्ये जयसिंग याच्या डोक्यात मार लागला. तसेच त्याचा अपघात झाल्याची माहिती ही कोणाला मिळाली नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी वाकवड येथील ग्रामस्थांच्या ही बाब निदर्शनास आली. ग्रामस्थांनी पोलीस पाटलांना ही बाप कळवल्यानंतर पोलीस पाटलांनी भूम पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हा मृतदेह जयसिंग पवार राहणार भूम याचा असल्याचे गाडीच्या नंबर वरून पोलिसांनी शोधून काढले. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश उडाला. त्याच्या वडिलांचे जयसिंग हा लहान असतानाच निधन झाले होते. त्याची आई व त्याने स्व कष्टाच्या बळावर आजपर्यंत कुटुंबातील इतर लोकांचा संभाळ केला होता. मात्र या रस्त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या जयसिंगचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांनीही तक्रारी दिल्या आहेत. मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. तसेच ठेकेदारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून ठेकेदारास काळे यादीत टाकावे अशी मागणी जयसिंग पवार यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्याच्या पश्चात आई, लहान बहीण व भाऊ असा परिवार आहे. त्याच्यावर भूम येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.