धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेबाबत जनजागृती व अंमलबजावणीसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळांमध्ये संबंधित तालुक्यांतील ग्रामसेवक व सरपंच यांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
परंडा तहसील कार्यालय येथे झालेल्या कार्यशाळेत तहसीलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी मोहन राऊत,मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे,उपविभागीय जलसंधारण अधिकारी टी.पी.हनवते,जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार जैन,सचिव जयघोष जैन,राज्य समन्वयक अशोक पवार व तालुका अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल उपस्थित होते.
त्याचप्रमाणे भुम,लोहारा,उमरगा व तुळजापूर येथेही अशाच कार्यशाळा घेण्यात आल्या.भुम येथे तहसीलदार जयंतराव पाटील,लोहारा येथे रणजित कोळेकर, उमरगा येथे गोविंद येरमे तर तुळजापूर येथे पंचायत समिती सभागृहात ही कार्यशाळा झाली.सर्व कार्यशाळांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी योजनेची रूपरेषा मांडली.
उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर.के.काळे,बी.एम.बसपुरे व सायली जाधव यांचेही मार्गदर्शन लाभले.जैन संघटनेचे समन्वयक अशोक पवार यांनी योजनेच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारण,शिवार क्षेत्राचे पुनरुज्जीवन व शाश्वत शेतीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.