भूम (प्रतिनिधी)- जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरात नुकत्याच घडलेल्या अतिरेकी हल्ल्याचा भूम तालुक्यातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भूम शहरातील समस्त सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी, भूम यांच्याकडे निवेदन सादर केले.
या अतिरेकी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. या प्रकारामुळे राष्ट्रीय सुरक्षेची स्थिती आणि अतिरेकी धोके याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले.
सकल हिंदू समाज बांधवांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून, केंद्र सरकारने भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच, या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे व त्यांना आर्थिक व मानसिक आधार द्यावा, असेही आवाहन करण्यात आले. या निवेदनावर अनेक हिंदू समाज बांधवांच्या सह्या असून, एकत्रितपणे पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी आवाज उठवण्यात आला आहे.