भूम (प्रतिनिधी)- बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांची सेवा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भूम बस स्थानकावर गेल्या एक महिन्यापासून पाण्या वाचून प्रवाशांचे हाल होत आहेत.
याबाबत सविस्तर असे की प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून राज्यभर गाजावाजा असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या भूम आगारात या घोषणेला उलट वातावरण चालू झाले आहे. भूम आगारातून सध्या कुठलीही बस वेळेवर जात नाही. सकाळी सातला जाणारी भूम-मुंबई, भूम-बोरवली या बसेस नऊच्या आसपास जात आहेत. तर आंतरराज्य जाणारी भूम-हैदराबाद ही बस रोज दुपारी बारा वाजता जात आहे. यामुळे प्रवाशांना बस स्थानकावर ती तात्काळ थांबावे लागत आहे. बस स्थानकातील प्रवाशांच्या सेवेसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा दिसत नाही. बस स्थानकातील पंखे हे कधीतरी चालू होतात. तर स्वच्छता ही नावालाच आहे विशेष म्हणजे स्थानकावरील प्रवाशांसाठी पाण्याची सोय कुठेही दिसत नाही बस स्थानकात दोन टाक्या दिसत आहेत. पण दोन्हीही कोरडे आहेत. याबाबत वारंवार आगार प्रमुख आणि धाराशिव येथील विभागीय वाहतूक अधिकारी यांना कल्पना देऊनही याबाबत कुठलीही सुधारणा होत नसल्याने पाण्या वाचून प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या सुट्ट्याचा हंगाम चालू असल्याने व सकाळच्या शाळा चालू असल्याने एसटी महामंडळाच्या या गलथान कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना तासून तास स्थानकावरती बसून राहावे लागत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हे विद्यमान परिवहन मंत्री असल्याने ते तरी याकडे लक्ष देतील का? याबाबत नागरिकातून अपेक्षा व्यक्त होत आहे. आगाराच्या या कारभाराबद्दल धाराशिव येथील वरिष्ठांशी संपर्क साधला असता सध्या मनुष्यबळ कमी आहे असे कारण सांगितले जात आहे.