भूम (प्रतिनिधी)- अल्पशा आजाराने वर्गमित्र काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हे वृत्त समजताच वर्गमित्रांनी त्यांचे सांत्वन करीत आर्थिक मदत केली. पंकज सोनवणे (रा. गोलेगाव, ता. भूम) यांचे 30 मार्चला अल्पशा आजाराने निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता माणूस अकाली गेल्याने कुटुंबीयांसमोर अनेक अडचणी आहेत. पंकज सोनवणे हे येथील रवींद्र हायस्कूलमधील 1996 च्या दहावी बॅचचे विद्यार्थी होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मित्र परिवाराला धक्का बसला. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने सोनवणे कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्धार वर्गमित्रांनी केला. सर्वांनी मदत जमा करीत गोलेगाव येथे भेट देत सोनवणे कुटुंबीयांचे सांत्वन करीत 51 हजार 101 रुपयांची रक्कम पंकज सोनवणे यांची पत्नी काजल सोनवणे, मुलगा पराग आणि पवन कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. यावेळी ॲड. सदाशिव गुंजाळ, सचिन क्षीरसागर, जाकीर शेख, विशाल काळे, नाना मदने, प्रदीप डोके, प्रशांत शेटे, शंकर कदम, पत्रकार शाम पालके उपस्थित होते.