तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी मंदिरात सात व्यक्ती तीन दिवस मंदीरात सतत दिसुन येत असल्याचा पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पोलिसांच्या हवाली केले. त्याची सखोल चौकशी केली असता ते मंगळवेढा येथील भाविक निघाल्याने त्यांना सोडुन दिल्याचे तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले. पहलगाम दशहतवादी हल्ला पार्श्वभूमीवर सर्वञ दक्षता घेतली जात असल्याचे दिसुन आले.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, बुधवार दि. 23 एप्रिल रोजी वेळ सायंकाळी 5:27 ते 5:34 या दरम्यान चार ते पाच व्यक्ती दर्शन मंडपातील तिसऱ्या मजल्यावरील प्रवेशद्वाराला सुरक्षा रक्षक शिवाजी उमाप, सुरक्षा फील्ड ऑफिसर बिभिषण माने व सुरक्षा विभाग प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम पाटील यांना राऊंड चेकिंगला जात असताना आढळून आल्या. सुरक्षा रक्षकांनी त्या संशयित व्यक्तींची चौकशी केली असता ते फिरवा फिरविची उत्तरे देऊ लागले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही इथे थांबू नका, दर्शन झाले असेल तर तात्काळ मंदिर परिसराबाहेर जा असे सांगितले. दोन सुरक्षा रक्षक त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पाठवले. त्या संशयित व्यक्ती धर्मदर्शन रांगेतून दर्शनासाठी गेल्या. गुरुवार दि. 24 एप्रिल रोजी पुनश्च दुपारी 3:40 ते 3:46 या दरम्यान पुन्हा एकदा ही मंडळी दर्शन मंडपातील तिसऱ्या मजल्याच्या प्रवेशद्वाराला आढळून आल्या. लागलीच कमलाकर पवार यांनी त्यांना हटकले व सांगितले की तुम्ही इथे कशाला थांबला आहात? त्यांना त्यांची ओळख विचारली असता ते फिरवा फीरवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना तेथे थांबू नका, मंदिराच्या बाहेर जा असे सांगितले. तत्काळ याचा रिपोर्ट मंदिर पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर व पोलीस कर्मचारी सोनटक्के यांना दिला.
शुक्रवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 4:52 ते 5:06 या दरम्यान मंदिर परिसरात पुन्हा ही मंडळी निदर्शनास आल्या. तात्काळ चार सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्या सर्व संशयित व्यक्तींना घेऊन प्रथम मंदिर पोलिस चौकी येथे नेण्यात आले. नंतर मंदिर पोलिस चौकी पोलिसांच्या सूचनेनुसार त्या संशयित व्यक्तींना तुळजापूर शहर पोलिस चौकी येथे नेण्यात आले. तेथे त्या सात संशयित व्यक्तींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ते मंगळवेढा येथील देविभक्त निघाल्याने त्यांना सोडल्याची माहीती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिली.