धाराशिव  (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्ह्यामध्ये लेबर न्यायालय सहकार न्यायालय व कामगार न्यायालय नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील सहकार संबंधी व कामगार विषयक खटले चालविल्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारदारांना देखील सदरील न्यायालये ही सोलापूर व लातूर येथे असल्यामुळे तेथे जावे लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडा बरोबरच त्यांच्या वेळचा देखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. ही निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मी माझ्या कालावधीमध्ये शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून लेबर, सहकार व कामगार न्यायालये धाराशिव येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची विशेष माहिती धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे नूतन अध्यक्ष ॲड. अमोल वरुडकर यांनी दिली.

पुढे बोलताना ॲड. वरुडकर म्हणाले की, शासकीय नोकरी मिळणे कठीण असल्यामुळे वकिलीचा कोर्स पूर्ण करून 2004 पासून वकिली व्यवसायात पाऊल टाकले. सुरुवातीला ज्येष्ठ विधीज्ञ. मिलिंद पाटील यांच्या हाताखाली कामकाज 2008 पर्यंत काम केले. यादरम्यान मी स्वतः देखील काही फौजदारी खटले न्यायालयांमध्ये त्याची सक्षमपणे बाजू मांडून न्याय पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र 2008 मध्ये वाशी तालुक्यातील इंदापूर येथील यादव यांच्या खून प्रकरणी 16 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. हे आव्हान माझ्यासमोर मोठे होते. हे प्रकरण सातारा येथील ॲड धैर्यशील पाटील, पुणे येथीलॲड.हर्षद निंबाळकर, ॲड.दत्तात्रेय (आबा) बारखडे व मी स्वतः याप्रकरणी सक्षमपणे बाजू मांडण्याचे काम केले.

तो खटला उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात 3 वर्षे चालला, त्याचा निकाल 2011 साली लागला. या प्रकरणाने माझ्या वकिली व्यवसायाला जबरदस्त टर्निंग पॉईंट (कलाटणी) मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर माझा न्यायालय मध्ये बाजू मांडण्याचा प्रचंड आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे तेथून आजपर्यंत मी कधीही मागे फिरून पाहिले नाही. मी सतत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आलो असून यामध्ये काही जणांकडे पैसे नसले तरी मी मोफत त्यांचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अनेक जनावर एफ आय आर म्हणजेच प्रथम खबर रिपोर्ट दुष्ट हेतूने दाखल केले जातात. यामध्ये वास्तव वस्तुस्थिती आणि एफआयआर मधील नोंदविलेला गुन्ह्यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे निष्पाप आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याचे मार्ग मोकळे होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. न्यायालयामध्ये काम करीत असताना मी धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळ या संस्थेचा सभासद झालो. या आधी निवडणूक कधीच लढविण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, 2025 च्या निवडणुकीत उभा राहिलो आणि सर्व वकील बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला थेट अध्यक्षपदाची धुरा माझ्यावर सोपविली. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.  महिला वकिलांना स्वतंत्र आसण व्यवस्था निर्माण करणे, नोटरी वकील मंडळींना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न सुरू असून ते लवकरच मार्गी लागतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


सर्व वकिलांना 10 लाख रुपयांचे अपघाती विमा सुरक्षा कवच देणार !

सर्वच वकीलांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  त्यामुळे सर्व वकिलांचा अपघाती विमा उतरवून त्यांना दहा लाख रुपयांचे अपघाती सुरक्षा कवच प्रदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नोकरीच्या मागे न लागता वकीलीचा व्यवसाय

माझे वडील परंडा पंचायत समितीमध्ये कारकून होते. माझा जन्म धाराशिव तालुक्यातील वरूडा येथे झाला असून सातवीपर्यंत शिक्षण परंडा येथील जिल्हा परिषद शाळेत तर आठवी ते दहावी श्रीपतराव भोसले हायस्कूल व अकरावी ते एलएलबीपर्यंत रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे झाली आहे. माझ्या घरी वकिलीची कुठलीच पार्श्वभूमी नसताना मी हा व्यवसाय निवडला. वकिलीमध्ये करियर घडवीत आहे. न्यायव्यवस्थेत जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्राधान्य देणार असल्याचे ॲड. अमोल वरुडकर यांनी आवर्जून नमूद केले.

 
Top