धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्ह्यात १२ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत प्लाझमा बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध पक्ष,संघटना व मंडळांकडून मिरवणुका,रॅली व शोभायात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.या मिरवणुकांमध्ये प्लाझमा व लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता आहे.अशा तेजस्वी प्रकाशाच्या वापरामुळे लहान मुले, वयोवृद्ध व सामान्य नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याचा धोका संभवतो.तसेच, वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताची व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर,अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) अन्वये संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात प्लाझमा व लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी आदेश जारी केला आहे.हा आदेश १२ ते ३० एप्रिल २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.जयंती उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा, या हेतूने नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


 
Top