धाराशिव (प्रतिनिधी)-  निर्गम उतारे काढण्यासाठी आवश्यक असलेल्या जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळामधील जुन्या व नव्या सर्व रेकॉर्डचे स्कॅन करून जतन व संवर्धन करून संगणकीकरण तसेच पुनर्लेखन करण्यात यावे, अशी मागणी  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी (दि.29) निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले की,  मराठा समाजासाठी देण्यात आलेल्या एसईबीसी आरक्षणाचे व खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी 1967 पूर्वीचा पुरावा मागितला जातो. या 1967 पूर्वीच्या पुराव्यासाठी तसेच मराठा समाजासाठी जातीचा उल्लेख असलेले जिल्हा परिषद शाळेमध्ये जुन्या नोंदीच्या आधारे निर्गम उतारे काढले जातात. परंतु जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे बहुतांश जिल्हा परिषद शाळामधील जुने रेकॉर्ड खराब झाले असून काहींचे पुरावे नष्ट झाले असून काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते रेकॉर्ड खराब झाल्यामुळे आज एसईबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी अडचण होत आहे. त्या प्रवर्गात येत असूनही त्यांची मोठी अडचण होत आहे. भविष्यात तर हे रेकॉर्ड नष्ट झाल्यास येणाऱ्या पिड्यांची मोठी हानी होणार आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता संपूर्ण जिल्ह्याभरातील सद्यस्थितीत ज्या प्रकारे रेकॉर्ड त्या सर्व फाटक्या तुटक्या रेकॉर्डसहित नव्या जुन्या सर्वांचे स्कॅन करून त्याचे जतन व संवर्धन करावे. तसेच नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या सर्व नोंदीचे स्कॅन व त्यासोबत पुनर्लेखन देखील करावे अशी विनंती केली आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी लोकांकडे जुन्या काळात घेतलेल्या छेडछाड न केलेले मूळ प्रतीतील निर्गम उतारे व मूळ टी. सी. उपलब्ध असतील तर त्याची देखील सक्षम अधिकाऱ्यामार्फत किंवा समिती नेमून तपासणी करावी. खराब होत चाललेल्या रेकॉर्डचे जतन व संवर्धन करताना त्याचा देखील आधार घेण्यात यावा. जेणेकरून पुढील पिढ्यांचे गंभीर नुकसान टळेल. त्यामुळे वरील मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे.

 
Top