धाराशिव (प्रतिनिधी)-संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात सुमारे दहा हजार पानांचे दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु या प्रकरणामध्ये आणखी महत्वाचे धागे पोलिसांच्या हाती लागले असून, पुन्हा पुरवणी दोषारोपत्र दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधिक्षक जाधव बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शफाकत आमना उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी सांगितले की, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही. तपास अत्यंत बारकाईने केला जात आहे. 22 फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यांची गोपनीय माहिती काढण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात आणखी महत्वाचे धागे हाती लागले आहेत. यामुळे या प्रकरणी आणखी खोलवचर तपास करून यामध्ये पुरवणी दोषारोपत्र दाखल करण्यात येणार आहे. तपास अधिकारी बदलण्यासंदर्भात कोणतीही मागणी आलेली नाही. तपास अत्यंत योग्य पध्दतीने सुरू असून, लवकरच या संदर्भात चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. बार्शी येथे पकडण्यात आलेल्या आरोपींचे कनेक्शन तुळजापूरशी कसे आहे, याचाही तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

तुळजापूरात जवळपास चार ते साडेचार हजार पुजारी आहे. यापैकी काही जणांची नावे या गुन्ह्यात आलेली असल्यास त्यांना मंदिरात पूजाअर्चा करण्याची प्रक्रिया करण्यास बंदी घालण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी पुजार यांनी यावेळी दिली. मंदिर समितीची याबाबत बैठक घेण्यात आली असून, सर्व पुजारी मंडळाच्या प्रमुखांचे म्हणणे याबाबत ऐकून घेण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार सर्व प्रक्रिया यामध्ये केली जाणार आहे. असेही जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले. 


 
Top