धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या पवनचक्की उभारणीसह संबंधित कामांच्या प्रकरणात 180 तक्रारी आलेल्या आहेत. यामध्ये 84 तक्रारीवर चौकशी करून निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित 96 तक्रारींची 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा पवनचक्की समन्वय समिती अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी दिली.
धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पुजार यांनी मासिक पत्रकार परिषद घेवून विविध विषयांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पवनचक्की जिल्हा समन्वय समितीची दि. 23 एप्रिल रोजी बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील उपविभाग अंतर्गत कार्यालयात पवनचक्की उभारणीसह विविध कामामध्ये आतापर्यंत 180 तक्रारी प्राप्त झालया आहेत. यापैकी 84 तक्रारींची चौकशी पूर्ण झाली असून, या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित 96 तक्रारींची चौकशी सुरू आहे. या 96 तक्रारींचा निपटारा 15 दिवसात करण्याचे चौकशी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पुजार यांनी दिली.
जिल्हा पुरवठा विभागातील विविधि गैरव्यवहार, बेकायदेशीर रेशन वाहतूक, गोदामातील त्रुटी, धान्यांची कमतरता, रेशन दुकानातील अपहार आदी तक्रारींची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुजार यांनी दिली. तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणी पत्रकारांवर चुकीच्या टिपण्णी प्रकरणी पत्रकारांनी दिलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू असून, अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिरीष याद,ख मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, अपर पोलिस अधीक्षक हसन आदी उपस्थित होते.